नमस्कार,
सर्वप्रथम आपले आपल्या शाळेच्या \ कॉलेजच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत !!
प्रत्येकाच्या आयुष्यात आपली शाळा, कॉलेज जीवनातील आपले गुरूजण, मित्र यांचे वेगळे व खास स्थान असते. ‘माझी शाळा’ असा शब्द जरी कानावर पडला तरी मन आठवणींच्या सागरात डुबकी मारायला लागते. आम्हाला कल्पना आहे की तुमच्याही आयुष्यात तुमच्या शाळा / कॉलेज विषयीच्या भावना खुप खास आहेत.
तुमच्या सारख्याच असंख्य माजी विद्यार्थ्यांना एकदा तरी आपण आपल्या शाळेच्या बाकावर पुन्हा जाऊन बसावे, आपल्या शिक्षकांना भेटावे, त्या खास मित्रांना \ मैत्रिणींना भेटावे असे वाटत असेलच. आपण आपल्या परीने असा प्रयत्न केला असेल अथवा करत असाल. आणि हो, आमच्याकडुन शाळेसाठी \ संस्थेसाठी काही तरी करता आले तर आमची तयारी आहे, हा विचार सगळेच माजी विद्यार्थी व्यक्त करून दाखवतात.
आम्ही खडकी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, आपल्या संस्थेतून आजवर शिक्षण घेतलेल्या समस्त माजी विद्यार्थी \ विद्यार्थनींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सदर वेबसाईट हा या प्रयत्नांचा एक भाग आहे. आपणांस आपल्या शाळेपर्यंत पोहोंचविण्याचा हा छोटा प्रयत्न आहे. आपण सर्वांनी शक्य असेल तसे या प्रयत्नांना हातभार लावला हीच विनंती.
सदर माध्यमातून काम करत असताना, पुढीलप्रमाणे काही उद्दिष्टे ठरविले आहेत.
१) खडकी शिक्षण संस्थेस प्रदीर्घ इतिहास लाभला आहे. हा इतिहास जपताना तो नवीन पिढीला समजावा व जुन्या पिढीसाठी पुन्हा एकदा उजळणी व्हावी.
२) संस्थेमध्ये अनेक विभाग आहेत. आजतागायत या विभागांतून अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी शिक्षण घेतले आहे. या सर्व माजी विद्यार्थी / विद्यार्थिनींना एका समान धाग्याने विणने.
३) अनेक माजी विद्यार्थी यांचा संस्थेसाठी काही योगदान देण्याचा मानस असतो तसेच सद्य विद्यार्थी वा संस्था यांच्या अनेक गरजा असतात याचा कुठेतरी मेळ घालणे.
४) संस्थेत सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक गुणवाढीसाठी माजी विद्यार्थी यांच्या मार्फत काही प्रयत्न करणे.
५) आजी/ माजी शिक्षक, आजी/माजी विद्यार्थी यांच्यातील कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. त्या संदर्भातील घडामोडी सर्वांना उपलब्ध करून देणे.
६) शिक्षक व विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा आयोजित करणे.
७) मराठी शाळेत शिकून मोठं पद मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि मराठी शाळेची पट संख्या वाढविण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांना हातभार लावणे.